- राजस्थानमधून आणलेले ५ लाखांचे अफीम जप्त
- सीसीबी पोलिसांची कारवाई
बेळगाव : शहरात सीसीबी पोलिसांनी मोठी कारवाई करत हायवे जवळ बेकायदेशीरपणे अंमली पदार्थांची विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. राजस्थानमधून विक्रीसाठी आणलेले लाखो रुपये किमतीचे अफीम पोलिसांनी जप्त केले आहे.
हिंडलगा फॅक्टरी जवळील एनएच ४८ हायवेच्या सर्व्हिस रोडवर सिसिबी विभागाचे पीआय मंजुनाथ नायक आणि त्यांच्या पथकाने छापा टाकला. राजस्थानमधून अफीम आणून बेंगळुरू येथील एका व्यक्तीला विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजस्थानमधील एका संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
त्याच्याकडून ५,००,००० रुपये किमतीचे १.०४८ किलोग्रॅम काळे अफीम आणि ५०,००० रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण ५,५०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघा संशयितांविरुद्ध माळमारुती पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, कारवाई करणाऱ्या पोलीस पथकाचे बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी कौतुक केले आहे.








