- ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : ग्रामीण भागातील तुरमुरी गावाजवळ उभारण्यात आलेल्या कचरा डेपोमुळे स्थानिक नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत निवेदन सादर केले. कचरा डेपोची समस्या दिवसागणिक वाढत असल्याने त्यावर तातडीने कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशासनाने यापूर्वी हा कचरा डेपो अन्यत्र स्थलांतरित करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप त्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तसेच ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची प्रक्रिया प्रभावीपणे राबवली जाईल, असे सांगण्यात आले होते; परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालेली दिसून येत नसल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला.
गेल्या दोन दशकांपासून या डेपोमुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रश्नासंदर्भात यापूर्वी अनेक वेळा चौकशी करून अहवालही सादर करण्यात आले आहेत. मात्र संबंधित विभागाकडून अपेक्षित कारवाई झाली नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.
यावेळी गावचे नेते नागराज जाधव यांनी, “तुरमुरीतील हा कचरा डेपो तातडीने हटवण्यात यावा. अन्यथा गावातील सर्व नागरिक एकत्र येऊन जिल्हा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन उभारतील,” असा इशारा दिला. निवेदन सादर करताना तुरमुरी गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.








