निपाणी : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या लढ्याला पुन्हा एकदा गती देण्यासाठी सीमाभागातील मराठी भाषिक एकवटणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता कोल्हापुरातील दसरा चौक येथे एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात निपाणी शहर आणि परिसरातील मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन निपाणी भाग महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना आणि मराठी भाषिकांच्या वतीने करण्यात आले आहे.

या आंदोलनाच्या नियोजनासाठी शनिवार, १४ नोव्हेंबर रोजी निपाणी येथील निपाणकर राजवाड्यात पूर्वतयारी बैठक घेण्यात आली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या निपाणी भागाचे अध्यक्ष जयराम मिसजकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आंदोलनाची रूपरेषा निश्चित करण्यात आली. तसेच कोल्हापूरला जाण्याची व्यवस्था, कार्यकर्त्यांची नोंदणी आणि सहभाग यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

बैठकीला डॉ. अच्युत माने, विजयराजे देसाई-निपाणकर, रमेश निकम, नवनाथ चव्हाण, उदय शिंदे, प्रकाश रावण, लक्ष्मीकांत पाटील, कबीर वराळे, तुकाराम कोळी, अमोल शेळके, अमर विटे आणि एस. के. पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

गेल्या सात दशकांहून अधिक काळ सीमाभागातील मराठी भाषिक महाराष्ट्रात सामील होण्यासाठी संघर्ष करत आहेत. मात्र, अद्याप या प्रश्नावर तोडगा निघालेला नसल्याने सीमावासीयांमध्ये नाराजी आहे. सीमाप्रश्नी निर्णायक जनआंदोलन उभारण्याच्या उद्देशाने ‘चलो कोल्हापूर’ हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या लढ्यात प्रत्येकाने सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.

शुक्रवारी होणाऱ्या आंदोलनासाठी निपाणी बसस्थानक परिसरातील धर्मवीर छत्रपती संभाजीराजे चौकात कार्यकर्त्यांनी एकत्र जमायचे असून, तेथून सर्वजण कोल्हापूरच्या दिशेने रवाना होणार आहेत.

आंदोलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी जयराम मिसजकर, बाबासाहेब खांबे, उदय शिंदे, नवनाथ चव्हाण, अमोल शेळके (यरनाळ), लक्ष्मीकांत पाटील (भिवशी), के. डी. पाटील (कुर्ली), गणेश माळी (मस्तीवडे) आणि अमर विटे (कोगनोळी) यांच्याशी संपर्क साधून नाव नोंदवावे, असे आयोजकांनी कळवले आहे.