- १२,२४४ उमेदवारांचा सहभाग
बेळगाव : कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या (केपीएससी) राजपत्रित परिवीक्षाधीन अधिकारी पदासाठीची महत्त्वपूर्ण केएएस परीक्षा बेळगावमध्ये कडक सुरक्षा व्यवस्थेत पार पडली. शहरातील ३४ परीक्षा केंद्रांवर एकूण १२ हजार २४४ उमेदवारांनी परीक्षा दिली. परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली होती.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी परीक्षेच्या नियोजनाची आणि सुरक्षा व्यवस्थेची माहिती दिली. उमेदवारांनी कोणत्याही दबावाखाली न येता आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षित वितरणासाठी सकाळी ७ वाजता सीलबंद पाकिटे उघडण्यात आली. त्यानंतर कडेकोट पोलीस बंदोबस्तात नऊ स्वतंत्र मार्गांद्वारे सर्व परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका पोहोचविण्यात आल्या. परीक्षा शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली सुमारे २५० पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
परीक्षेतील संभाव्य गैरप्रकार रोखण्यासाठी सर्व केंद्रांवर तसेच प्रतीक्षा कक्षांमध्ये अधिकृत जॅमर, सीसीटीव्ही कॅमेरे आणि चेहरा ओळखण्याची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवणे शक्य झाले.

यंदाच्या परीक्षेत त्रिप्रत ओएमआर उत्तरपत्रिकेची व्यवस्था हे विशेष वैशिष्ट्य ठरले. प्रत्येक उमेदवाराला ओएमआर शीटच्या तीन प्रती देण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक प्रत स्कॅनिंगसाठी, दुसरी उमेदवाराच्या वैयक्तिक नोंदीसाठी, तर तिसरी प्रत पुढील दोन महिने जिल्हाधिकारी कार्यालयात सुरक्षित ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.








