• माजी महापौर मालोजी अष्टेकर यांच्याहस्ते अभिनंदन
  • चंदगड तालुक्याला मिळालेला ऐतिहासिक सन्मान असल्याची भावना

बेळगाव : कोल्हापूर जिल्ह्यातील अत्यंत प्रतिष्ठेची, मानाची आणि जनसामान्यांच्या अस्मितेशी जोडलेली संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी माजी आमदार श्री. राजेश नरसिंगराव पाटील यांची निवड झाल्याबद्दल आज रविवार, दि. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी बेळगाव येथे त्यांचा विशेष सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

बेळगाव येथील हनुमाननगरमधील त्यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी बेळगाव सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते तथा माजी महापौर श्री. मालोजी अष्टेकर (सर) यांच्या हस्ते राजेश पाटील यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी महाराष्ट्र एकीकरण समितीचे वैद्यकीय समन्वयक प्राचार्य श्री. आनंद आपटेकर, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, अनिल अंबरोळे, प्रसाद मरगाळे,उल्हास निंबाळकर, सुनील शिंदे, राजेश लोहार, विनायक बुरुड,सुनील चौधरी,बाबू पावशे,भारत बाळेकूंद्री यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

गोकुळ दूध संघाच्या स्थापनेपासून प्रथमच चंदगड परिसरातील नेतृत्वाला अध्यक्षपदाचा मान मिळणे ही अत्यंत अभिमानाची आणि ऐतिहासिक घटना असल्याचे उपस्थितांनी नमूद केले. राजेश पाटील यांच्या निवडीमुळे चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज या परिसरातील दूध उत्पादक शेतकरी, दूध व्यवसाय आणि सहकार क्षेत्राला निश्चितच नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी प्राचार्य श्री. आनंद आपटेकर यांनी, राजेश पाटील यांना मिळालेला हा सन्मान केवळ त्यांच्या वैयक्तिक यशापुरता मर्यादित नसून संपूर्ण चंदगड परिसरासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे आगामी काळात दूध व्यवसायाच्या विकासाबरोबरच सामाजिक, राजकीय आणि विविध लोकहिताच्या विषयांना चालना मिळेल. तसेच या भागातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला त्यांच्या माध्यमातून निश्चितच चांगले सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

याप्रसंगी अनिल अंबरोळे यांनीही राजेश पाटील यांच्या निवडीचे स्वागत केले. त्यांनी आजवर कोल्हापूर जिल्ह्यात केलेल्या सामाजिक कार्याची आणि जनसंपर्काची दखल घेऊन त्यांच्यावर गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे ही निवड अत्यंत योग्य आणि अभिनंदनीय असल्याचे त्यांनी सांगितले.

राजेश पाटील यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीमुळे चंदगडसह आजरा, गडहिंग्लज आणि सीमाभागातील सहकार क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.