- पोलीस यंत्रणेकडून तयारीला वेग
- शहरात ८०० सीसीटीव्ही कॅमेरे
- सुवर्णसौध परिसरात २ हजार बॅरिकेड्स
बेळगाव : बेळगाव येथे २ ते ११ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने नियोजन सुरू केले आहे. अधिवेशन काळात राज्यातील विविध भागांतून सुमारे पाच हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात केला जाणार आहे. तसेच सुवर्णसौध परिसर, शहरातील महत्त्वाची ठिकाणे आणि मान्यवरांच्या प्रवासाच्या मार्गांवर मिळून सुमारे ८०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
अधिवेशनाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी बुधवारी सुवर्णसौध परिसराला भेट देऊन पाहणी केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पोलीस प्रशासनाच्या नियोजनाची माहिती दिली. दहा दिवस चालणाऱ्या या अधिवेशनासाठी आवश्यक असलेल्या पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले असून, त्यासंदर्भातील मागणी राज्य पोलीस मुख्यालयाकडे पाठविण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
सुरक्षेच्या उपाययोजनांचा भाग म्हणून अधिवेशनाच्या संपूर्ण कालावधीत शहरात आणि सुवर्णसौध परिसरात सुमारे दोन हजार बॅरिकेड्स उभारण्यात येणार आहेत. याशिवाय गर्दीचे नियंत्रण, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी मोबाईल कमांड सेंटरचीही मागणी करण्यात आली आहे.
अधिवेशनासाठी येणारे सभापती, मंत्री, आमदार तसेच अन्य महत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासाच्या मार्गांवर विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. या मार्गांवर चोवीस तास अग्निशमन दलाची वाहने आणि रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी स्पष्ट केले.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून सुरक्षा आणि बंदोबस्ताचे नियोजन अधिक प्रभावी करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.








