• कार-लॉरीच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू ; चौघे गंभीर

गोकाक : बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यात मालदिन्नी क्रॉसजवळ कार आणि लॉरी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले. आज पहाटे हा अपघात घडला.

पुण्याहून सौंदत्तीच्या दिशेने जाणाऱ्या कारची यरगट्टीहून गोकाककडे येणाऱ्या लॉरीशी समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. या दुर्घटनेत कारमधील तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, मृत व्यक्ती पुण्यातील मांद्रे कुटुंबातील असल्याचे समजते. या घटनेची नोंद गोकाक ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.