- पालक, महिला आणि विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन
बेळगाव : शिंदोळी येथील सरकारी शाळा बंद करून ती ‘केपीएस मॅग्नेट’ योजनेअंतर्गत मास्तमर्डी येथील शाळेत विलीन करण्याच्या निर्णयाविरोधात आज शिंदोळी गावात पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन छेडले. ‘सार्वजनिक शिक्षण वाचवा’ समिती आणि ‘एआयडीएसओ’ संघटनेच्या संयुक्त नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सरकारच्या शिक्षण धोरणाचा तीव्र निषेध करण्यात आला.
शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर “आमची शाळा, आमच्या गावचे भूषण” असा फलक लावून आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रतिमा हातात घेऊन महिलांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभाग घेतला.
“आम्ही रोजंदारीवर काम करणारे गरीब लोक आहोत. गावात शाळा असल्यामुळे आमची मुले सुरक्षित राहतात. शाळा दुसऱ्या गावी हलवली तर मुलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार?” असा सवाल पालक रमा नागण्णावर यांनी उपस्थित केला. तर “मुलींवरील अत्याचारांच्या घटना वाढत असताना आम्ही मुलींना दुसऱ्या गावी पाठवणार नाही. खाजगी शाळांचे शुल्क भरण्याची आमची ऐपत नाही,” असे सांगत लक्ष्मी करेगार यांनी सरकारच्या निर्णयावर संताप व्यक्त केला.
एआयडीएसओचे जिल्हा समन्वयक महांतेश बिळूर यांनी सरकारवर जोरदार टीका करत ‘केपीएस मॅग्नेट’ योजनेच्या माध्यमातून शिक्षणाचे खाजगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. “महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि विद्यासागर यांनी सर्वसामान्यांसाठी शिक्षणाचे स्वप्न पाहिले होते. मात्र आज त्याच शिक्षणापासून गरीबांना दूर केले जात आहे,” असे ते म्हणाले.
आंदोलनानंतर निलजी ग्रामपंचायतीचे अध्यक्ष सतीश शहापूरकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. “सरकारी शाळा बंद करणे म्हणजे गरीब विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. ग्रामस्थांच्या भावना आणि मागण्या तातडीने सरकारपर्यंत पोहोचवल्या जातील,” असे आश्वासन त्यांनी दिले.
या आंदोलनात शांता शहापूरकर, शांता तिप्पण्णागोळ, भरमव्वा शहापूरकर, लक्ष्मी शहापूरकर, बाळव्वा अगसीमनी, माळिंगराया तिप्पण्णागोळ, भावकण्णा कणबरकर यांच्यासह मोठ्या संख्येने पालक, महिला, ग्रामस्थ आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.








