• चारही मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
  • रुग्णवाहिका आणि शववाहिकाही अडकल्या
  • नागरिकांना मोठा मनस्ताप

बेळगाव : ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी राणी चन्नम्मा चौकात छेडलेल्या मानवी साखळी आंदोलनाचा परिणाम शहरातील वाहतुकीवर झाला. चौकाला जोडणाऱ्या चारही प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने बेळगावात तीव्र वाहतूक कोंडी निर्माण झाली. रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाल्याने वाहनचालक आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शेतकऱ्यांनी शहरातील प्रमुख चौकात आंदोलन केल्याने वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला. चौकाकडे जाणाऱ्या चारही रस्त्यांवर किलोमीटरपर्यंत वाहने अडकून पडली. या कोंडीमुळे रुग्णवाहिकांसह आणीबाणीच्या वाहनांनाही पुढे जाण्यासाठी मार्ग मिळणे कठीण झाले. या वाहतूक कोंडीत दोन रुग्णवाहिका आणि एक शववाहिका अडकल्याचे दिसून आले. त्यामुळे अत्यावश्यक सेवांवरही परिणाम झाला. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे शहरातील प्रमुख मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली असून, शेकडो वाहनधारक आणि नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.