- महाविद्यालयाच्या सहा खेळाडूंची विद्यापीठ संघासाठी निवड
- प्राचार्यांसह शिक्षकांकडून अभिनंदन
बेळगाव : कित्तूर राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या (केआरसीयू) आंतरमहाविद्यालयीन हॉकी स्पर्धेत सांगोल्ली रायण्णा फर्स्ट ग्रेड कॉन्स्टिट्युएंट कॉलेज (एसआरएफजीसी), बेळगावच्या पुरुष संघाने तिसरे स्थान मिळविले. या स्पर्धेत महाविद्यालयाच्या सहा खेळाडूंची विद्यापीठाच्या ‘युनिव्हर्सिटी ब्लू’ संघासाठी निवड झाली असून, महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी भर पडली आहे.
केआरसीयूच्या मार्गदर्शनाखाली एसआरएफजीसी महाविद्यालयातर्फे ८ ऑक्टोबर २०२६ रोजी बेळगावातील सुभाषचंद्र बोस मैदानावर, म्हणजेच लेले मैदानावर, पुरुष आणि महिला गटातील आंतरमहाविद्यालयीन हॉकी स्पर्धा तसेच निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती. विद्यापीठाशी संलग्न विविध महाविद्यालयांच्या संघांनी या स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेतला. चुरशीच्या सामन्यांमध्ये एसआरएफजीसीच्या पुरुष संघाने तिसरे स्थान पटकावून उल्लेखनीय कामगिरी केली.
महाविद्यालयातील सृष्टी शेट्टी, संजोता चौगुले, प्रज्वला बेळवी, रोशन पाटील, आकाश आणि निधी पाटील या सहा खेळाडूंची विद्यापीठाच्या ‘युनिव्हर्सिटी ब्लू’ संघासाठी निवड झाली आहे. या निवडीमुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. एस. सी. पाटील, उपप्राचार्य प्रा. अर्जुन जंबगी, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. करुणा अमरुस्कर, डॉ. गिरीजाशंकर माने आणि सर्व कर्मचारीवर्गाने खेळाडूंचे अभिनंदन केले. प्राचार्यांनी संघाच्या कामगिरीचे कौतुक करत खेळाडूंना भविष्यातही उत्तम यश संपादन करण्यासाठी प्रोत्साहन दिले.








