- पालख्यांचे पुजारी आणि गल्ली पंच मंडळांचा सहभाग
- मंगळवारच्या सोहळ्याच्या तयारीवर होणार चर्चा
बेळगाव : बेळगावच्या ऐतिहासिक सीमोल्लंघन सोहळ्याच्या आयोजनासंदर्भात रविवार, १८ ऑक्टोबर रोजी महत्त्वपूर्ण संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शहर परिसरातील विविध पालख्यांचे पुजारी आणि गल्लीतील पंच मंडळांच्या प्रतिनिधींची ही बैठक सायंकाळी ५ वाजता पाटील गल्ली येथील सिद्धनाथ जोगेश्वरी मंदिराच्या सभागृहात होणार आहे.
सीमोल्लंघन सोहळ्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर शहर देवस्थान मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांच्याशी चर्चा केली आहे. त्यानंतर सोहळ्याच्या नियोजनाबाबत संबंधित सर्व घटकांशी एकत्रित चर्चा करून आवश्यक तयारीला अंतिम स्वरूप देण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
येत्या मंगळवारी होणाऱ्या सीमोल्लंघन सोहळ्याचे नियोजन, विविध पालख्यांचा सहभाग आणि आयोजनाशी संबंधित महत्त्वाच्या बाबींवर बैठकीत चर्चा होणार आहे. त्यामुळे शहर परिसरातील सर्व पालख्यांचे पुजारी आणि गल्ली पंच मंडळांच्या प्रतिनिधींनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन शहर देवस्थान मंडळाचे अध्यक्ष रणजित चव्हाण-पाटील आणि सचिव परशराम माळी यांनी केले आहे.








