- महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांचे प्रतिपादन
- बेळगावात घनकचरा व्यवस्थापन नियमांवर राज्यस्तरीय विभागीय संयुक्त सभेचे आयोजन
बेळगाव : घनकचऱ्यासह विविध प्रकारच्या कचऱ्याचे तंत्रज्ञानाच्या साहाय्याने योग्य पद्धतीने व्यवस्थापन करणे, त्याची योग्य विल्हेवाट लावणे आणि पुनर्वापराला प्रोत्साहन देणे ही सध्याच्या काळाची महत्त्वाची गरज असल्याचे प्रतिपादन महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी केले.
कर्नाटक सरकारच्या नगरविकास विभागातर्फे स्वच्छ भारत मिशन (नगरी) अंतर्गत शनिवारी सुवर्णसौध येथे घनकचरा व्यवस्थापन उपनियमांसंदर्भात बेळगाव आणि कलबुर्गी विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांची राज्यस्तरीय संयुक्त सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेचे उद्घाटन करताना आयुक्त बोलत होते.
कचरा व्यवस्थापनासंदर्भातील नियमांमध्ये २०१६ पासून वेळोवेळी बदल करण्यात आले आहेत. शासनाच्या मार्गदर्शनानुसार या नियमांमध्ये आवश्यक सुधारणा करून नवीन तरतुदींचा समावेश करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित घटकांच्या सूचना, मते आणि अनुभव जाणून घेण्यासाठी आयोजित केलेली ही सभा महत्त्वपूर्ण ठरेल, असे कार्तिक एम. यांनी सांगितले.
सभेच्या अध्यक्षस्थानी असलेले जिल्हा नगरविकास कक्षाचे योजना संचालक मल्लिकार्जुन कलादगी यांनी कचरा व्यवस्थापनाबाबत नागरिकांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण होणे आवश्यक असल्याचे नमूद केले. कचऱ्याची योग्य विल्हेवाट हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे, याची जाणीव नागरिकांना झाल्यास व्यवस्थापनातील अडचणी कमी होतील. जनजागृतीसोबतच नागरिक आणि विविध संस्था-संघटनांच्या सहभागातून कचऱ्याचे वैज्ञानिक पद्धतीने व्यवस्थापन करणे शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बेळगाव वाणिज्य आणि औद्योगिक संस्थेचे अध्यक्ष संदीप बागेवाडी यांनी बेळगावच्या औद्योगिक आणि आर्थिक महत्त्वाचा उल्लेख करत विकासाला चालना देण्याबरोबरच कचरा व्यवस्थापनाच्या नियमांबाबत उद्योजकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता व्यक्त केली. याबाबत योग्य माहिती आणि जनजागृती झाल्यास परदेशी गुंतवणूकदारांनाही आकर्षित करता येईल, असे त्यांनी सांगितले. हॉटेल उद्योजक संघाचे अध्यक्ष संजय पै यांनीही यावेळी आपले विचार मांडले. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे बेळगाव विभागीय अधिकारी हणमंतप्पा उपस्थित होते.
पौर प्रशासन संचालनालयाच्या कार्यकारी अभियंता भानुमती यांनी सभेचे प्रास्ताविक केले. अधिकारी सुष्मा, विघ्नेश आणि भानुमती यांनी प्रात्यक्षिकांसह कचरा व्यवस्थापनाबाबत माहिती दिली. त्यानंतर झालेल्या चर्चेत विविध भागधारकांनी सहभाग नोंदवत तोंडी आणि लेखी स्वरूपात महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या.
महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता हणमंत कलादगी यांनी स्वागत केले. यावेळी बंगळुरू पौर प्रशासन विभागाचे अधिकारी, बेळगाव महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागातील अभियंते अशोककुमार सज्जन, आदिल खान यांच्यासह बेळगाव आणि कलबुर्गी विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बसवराज कुप्पसगौडर यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार प्रदर्शनही केले.








