• हुबळीत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
  • प्रमुख मार्गांवर बॅरिकेड्स आणि १० फूट उंच लोखंडी ग्रील

हुबळी : ऊसदरात वाढ, एमएसपी वाढविण्यासह विविध मागण्यांसाठी कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसिरू सेनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर हुबळीतील केशवापूर येथील मयुरी इस्टेटमधील त्यांच्या निवासस्थानाभोवती पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे.

बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील हत्तरगी टोलनाक्यापासून हजारो शेतकऱ्यांनी बुधवारी सायंकाळपासून हुबळीकडे पदयात्रा सुरू केली. ऊसदरासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जोशी यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. त्यामुळे पोलिसांनी खबरदारी म्हणून परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे.

मंत्री जोशी यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या सर्वोदय सर्कल, रमेश भवन आणि शांडिल्य आश्रमाजवळील मार्गांवर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. याशिवाय, निवासस्थानासमोर आणि दोन्ही बाजूंच्या रस्त्यांवर सुमारे १० फूट उंचीचे लोखंडी ग्रील उभारण्यात आले आहेत. संभाव्य गर्दी आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलाच्या (केएसआरपी) तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत.

मंत्री जोशी यांच्या कार्यालयाबाहेरही बॅरिकेड्स लावण्यात आले असून, मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी आणि अतिरिक्त राज्य राखीव पोलीस दलाचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवासस्थानाकडे जाणाऱ्या मार्गांवर कडक सुरक्षा असल्याने परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला असून, वाहनचालकांना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.