- आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी
- एपीएमसी पोलीस ठाण्यासमोर निदर्शने
बेळगाव : शहरातील रेसकोर्स रोडवरील कॅफेमध्ये २२ वर्षीय तरुणावर टोळक्याने हल्ला केल्याच्या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी पीडित कैफ शेरखान याचे नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी एपीएमसी पोलीस ठाण्यासमोर निदर्शने केली. आंदोलकांनी पोलीस ठाण्याला घेराव घालत आरोपींच्या अटकेची मागणी लावून धरली.
टीव्ही सेंटरजवळील रेसकोर्स रोडवरील एका कॅफेमध्ये आझम नगर येथील रहिवासी कैफ शेरखान याच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती समजल्यानंतर कैफचे नातेवाईक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने एपीएमसी पोलीस ठाण्यासमोर जमले. हल्ल्यात सहभागी असलेल्या आरोपींना तातडीने ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
निदर्शनांदरम्यान नागरिकांमधील संताप लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी नारायण बरमणी यांनी एपीएमसी पोलीस ठाण्याला भेट दिली. त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून त्यांची बाजू ऐकून घेतली आणि परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणातील दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले. आरोपींना अटक करण्याच्या मागणीवर आंदोलक ठाम असून, या प्रकरणातील पुढील पोलीस कारवाईकडे लक्ष लागले आहे.








