• मतदार यादीतील संशयास्पद नोंदींची चौकशी करण्याची मागणी
  • जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

बेळगाव : बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीत ८ हजारांहून अधिक बोगस मतदारांची नावे असल्याचा आरोप भाजपने केला आहे. या संशयास्पद नोंदींची सखोल चौकशी करून पात्र नसलेल्या मतदारांची नावे यादीतून वगळावीत, अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मतदार यादीतील कथित त्रुटींकडे लक्ष वेधले. निवडणूक आयोगाकडून मतदार यादीच्या दुरुस्तीची प्रक्रिया सुरू असताना बेळगाव उत्तर मतदारसंघातील अनेक प्रभागांमध्ये स्थलांतरित नागरिकांसह कथित बोगस मतदारांची नावे समाविष्ट झाल्याचा दावा भाजपने केला आहे.

मतदार यादीतील आक्षेपार्ह नोंदी वगळण्यासाठी आवश्यक अर्ज सादर करण्याचा प्रयत्न केला असता बूथस्तरीय अधिकारी (बीएलओ) गुन्हे दाखल करण्याची भीती दाखवून अर्ज स्वीकारत नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे मतदार यादीतील त्रुटींविरोधात अधिकृतरीत्या हरकत नोंदविताना अडचणी येत असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

मतदार यादीतील संशयास्पद नोंदींची निष्पक्ष चौकशी करून नियमानुसार आवश्यक दुरुस्ती करावी आणि पात्र नसलेल्या मतदारांची नावे वगळण्याची प्रक्रिया राबवावी, अशी मागणी भाजपने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.