• शहर देवस्थान मंडळातर्फे लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिकांना निमंत्रण

बेळगाव : बेळगाव शहर देवस्थान मंडळातर्फे मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी पारंपरिक दसरा महोत्सव आणि सिमोल्लंघन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ४.३० वाजता विद्यानिकेतन मैदानावर (ज्योती कॉलेज मैदान) हा सोहळा होणार असून, शहरातील विविध देवस्थानांच्या पालख्या आणि सासनकाठ्यांच्या सहभागाने दसऱ्याची परंपरा जपली जाणार आहे.

सोहळ्याची सुरुवात चव्हाट गल्लीतील श्री जोतिबा देवाच्या सासनकाठीची आणि नंदीची विधिवत पूजा करून होईल. त्यानंतर हुतात्मा चौकात शहरातील विविध देवस्थानांच्या पालख्या आणि सासनकाठ्या एकत्र येतील. वाद्यांच्या गजरात हा लवाजमा सिमोल्लंघन सोहळ्यासाठी विद्यानिकेतन मैदानाकडे रवाना होणार आहे.

मैदानावर बेळगावचे वतनदार चव्हाण-पाटील घराण्याकडे असलेल्या पारंपरिक तलवारीचे देवस्थान मंडळाच्या वतीने शस्त्रपूजन करण्यात येणार आहे. यावेळी शहरातील मान्यवरांचा सत्कारही आयोजित करण्यात आला आहे.

या सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी देवस्थान मंडळाचे अध्यक्ष रणजित चव्हाण-पाटील आणि सेक्रेटरी परशराम माळी यांनी महापौर प्रीती कामकर, आमदार आसिफ सेठ, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त प्रकाश निकम आणि महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांना निमंत्रण दिले आहे.

बेळगावच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक असलेल्या या दसरा महोत्सवाला शहरातील पंच मंडळे, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन देवस्थान मंडळातर्फे करण्यात आले आहे.