बेळगाव : ‘एसटीएम’ समर्थ नगरची आई भवानी देवीला श्री रेणुका देवी महिला मंडळाच्यावतीने मानाची साडी-चोळी देण्यात आली. गुरुवारी सायंकाळी समर्थनगर, क्रॉस नंबर 5 येथून श्री रेणुका देवी महिला मंडळाच्या भगिनींनी सवाद्य मिरवणुकीद्वारे ही मानाची साडी-चोळी एसटीएम’ समर्थ नगरच्या आई भवानी देवीच्या शामियान्यात नेली. यावेळी भगिनींनी डोईवर पवित्र कलश आणि हातात आरती घेतली होती. मंडळाच्या महिलां भगिनींनी आई भवानी देवीच्या नावाचा जयघोष केला.
मिरवणूक ‘एसटीएम’ समर्थ नगरच्या श्री भवानी देवीच्या मंडपात आल्यानंतर श्री रेणुका देवी महिला मंडळाच्या सदस्यांनी देवीची ओठी भरून लोककल्याणासाठी प्रार्थना केली आणि वाजत-गाजत नेलेली मानाची साडी देवीच्या चरणी अर्पण केली. यानंतर देवीची महा आरती करण्यात आली. पूजा-आरतीनंतर प्रसाद वितरीत करण्यात आला.
यावेळी समर्थ नगर मधील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री रेणुका देवी महिला मंडळाच्यावतीने ‘एसटीएम’ च्या आई भवानी देवीला ‘अर्पण करण्यात आलेली ही मानाची साडी शुक्रवारी ‘एसटीएम’ च्या आई भवानीला नेसविण्यात आली.








