• आषाढी एकादशीला विठुरायाच्या चरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे साकडे
  • सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा
  • वारकऱ्यांच्या भक्तीने फुलली पंढरी ; लाखो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याहस्ते शनिवारी पहाटे विठुरायाची सपत्नीक शासकीय महापूजा भक्तिभावाने संपन्न झाली. यावेळी राज्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस पडावा, शेतकरी सुखी-समृद्ध व्हावेत, महाराष्ट्रावर विठुरायाची कृपादृष्टी कायम राहावी आणि जनतेच्या जीवनात आनंद व समाधान नांदावे, अशी प्रार्थना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विठ्ठलाच्या चरणी केली.

यंदाच्या शासकीय महापूजेसाठी धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील शेतकरी बाळासाहेब माने आणि त्यांच्या पत्नी प्रभावती माने यांची ‘मनाचे दाम्पत्य’ म्हणून निवड करण्यात आली. त्यांना मुख्यमंत्री दाम्पत्यासमवेत शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा मान मिळाला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारीच पंढरपुरात दाखल झाले होते. शनिवारी पहाटे सुमारे अडीच वाजता विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडल्यानंतर रुक्मिणी मातेचीही महापूजा करण्यात आली. त्यानंतर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री आणि अमृता फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांना आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्याचा मान सहाव्यांदा मिळाला.

महापूजेनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “विठ्ठलाच्या मंदिरात आल्यानंतर नवी ऊर्जा मिळते. राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडावा, अशीच विठुरायाकडे प्रार्थना केली आहे. तसेच देशातील तरुणाईला योग्य दिशा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विठुरायाचा आशीर्वाद लाभावा, अशीही प्रार्थना केली.”

दरम्यान, आषाढी एकादशीनिमित्त पहाटेपासूनच विठ्ठलनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. लाखो वारकरी आणि भाविकांनी विठ्ठलनामाचा गजर करत पंढरपुरात हजेरी लावली आहे. दर्शनासाठी २० ते २५ किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत असून चंद्रभागा नदीच्या तीरावरही वारकऱ्यांचा जनसागर उसळला आहे.