• भुदरगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर : महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि मध्य प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुरू बाळूमामा देवस्थानाच्या आर्थिक व्यवहारांतील तब्बल ६० कोटी ७५ लाख २८ हजार ६० रुपयांच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात तत्कालीन निरीक्षक तथा कार्याध्यक्ष रागिणी झुंजारराव खडके, सचिव रावसाहेब कोणकेरी यांच्यासह संबंधित विश्वस्त, कंत्राटदार, व्यापारी आणि इतर संबंधित व्यक्तींविरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मार्च २०२० ते मार्च २०२६ या कालावधीत देवस्थान समितीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये संगनमत करून निधीचा अपहार करण्यात आल्याचा आरोप आहे. या गैरव्यवहारासाठी बनावट कागदपत्रे तयार करणे, विश्वासघात, फसवणूक तसेच पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

तपासात संबंधितांनी संगनमताने आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, याप्रकरणी तत्कालीन कार्याध्यक्ष रागिणी खडके, सचिव रावसाहेब कोणकेरी तसेच इतर संबंधित विश्वस्त, व्यापारी, कंत्राटदार आणि मध्यस्थांना आरोपी करण्यात आले आहे.

आरोपींविरुद्ध फसवणूक, विश्वासघात, बनावट कागदपत्रे तयार करणे व त्यांचा वापर करणे तसेच गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कथित गैरव्यवहाराची एकूण रक्कम ६० कोटी ७५ लाख २८ हजार ६० रुपये असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.