- वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम ; १०५ वाहनचालकांना दंड
बेळगाव : शहरात विना नंबरप्लेट किंवा सदोष नंबर प्लेट असलेल्या दुचाकींचा वाढता वापर लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम राबवत नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कठोर कारवाई केली. या मोहिमेत एकूण १०५ दुचाकी चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली.
२३ जुलै २०२६ रोजी राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेदरम्यान वाहतूक पोलिसांनी नोंदणी क्रमांक नसलेल्या, नंबर प्लेट लपवलेल्या तसेच वाहनाच्या पुढील किंवा मागील बाजूस नंबर प्लेट नसलेल्या दुचाकींची तपासणी केली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व वाहनचालकांवर दंड आकारण्यात आला.
यावेळी वाहनचालकांना वाहतूक नियमांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच नियमानुसार नंबर प्लेट बसवल्यानंतरच संबंधित वाहने सोडण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.
बेळगाव शहरात विना नंबरप्लेट किंवा सदोष नंबर प्लेट असलेल्या वाहनांविरोधातील ही विशेष मोहीम आगामी काळातही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
सर्व वाहनमालक आणि वाहनचालकांनी आपल्या वाहनांवर शासनाने निर्धारित केलेली नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट बसवून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.








