• दोन वाहने जप्त ; पुढील तपास सुरू

बेळगाव : उद्यमबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुचाकी चोरी प्रकरणाचा यशस्वी छडा लावून पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या चौकशीत चोरीची कबुली मिळाल्यानंतर एकूण ६५ हजार रुपये किमतीची दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत.

गुरुप्रसाद नगर येथील रहिवासी नागराज रामचंद्र आचारी यांची दुचाकी १७ जुलै रोजी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. याप्रकरणी उद्यमबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक महांतेश व्ही. होसपेटी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली.

तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक यु. बी. कट्टीकर, प्रवीण बिरादार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संशयित दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीदरम्यान त्यांनी वाहनचोरीची कबुली दिली.

या कारवाईत २५ हजार रुपये किमतीची एक स्कूटर आणि ३५ हजार रुपये किमतीची एक मोटारसायकल असा एकूण ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात नियमानुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, वाहनचोरीच्या इतर घटनांशी त्यांचा संबंध आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.