- सामाजिक उपक्रमांना प्राधान्य द्या
- मध्यवर्ती गणेश उत्सव महामंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : आगामी सार्वजनिक गणेशोत्सव शांततापूर्ण, सुरक्षित आणि सामाजिक बांधिलकी जपत उत्साहात पार पडावा, यासाठी प्रशासनाने सर्व विभागांचा समन्वय साधून पूर्वतयारीची कामे तातडीने सुरू करावीत, अशी मागणी मध्यवर्ती गणेश उत्सव महामंडळाच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडे करण्यात आली.
महामंडळाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. निवेदनात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियोजन, पोलीस बंदोबस्त, स्वच्छता, आरोग्य सुविधा, वीजपुरवठा, अग्निसुरक्षा, आपत्कालीन यंत्रणा आदी बाबींचे नियोजन तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली. तसेच सर्व संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन उत्सवाच्या तयारीचा आढावा घ्यावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी व्यासपीठ ठरावे, यासाठी शासनाच्या सहकार्याने व मध्यवर्ती गणेश उत्सव महामंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्याची मागणीही करण्यात आली. शैक्षणिक जनजागृती, मोफत वैद्यकीय शिबिरे, रक्तदान, व्यसनमुक्ती अभियान, युवकांसाठी मार्गदर्शन, बौद्धिक व्याख्याने तसेच विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणारे उपक्रम उत्सव काळात राबवावेत, अशी सूचना निवेदनातून करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पूर्वतयारी बैठकीतही महामंडळाच्या प्रतिनिधींनी सहभाग घेऊन विविध सूचना मांडल्या.
निवेदन सादर करताना मध्यवर्ती गणेश उत्सव महामंडळाचे अध्यक्ष श्री रमाकांतदादा कोंडुस्कर, कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील, कार्यकारी सचिव प्राचार्य आनंद आपटेकर, संपर्कप्रमुख विकास कलघटगी, उपाध्यक्ष सागर पाटील, सरचिटणीस महादेव पाटील, तसेच सुनील बोकडे, प्रसाद मरगाळे, दुर्गाप्रसाद जोशी आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.







