कावळेवाडी : राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेच्या वतीने कर्ले येथील माध्यमिक विद्यालयाला वॉटर फिल्टर भेट देण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

कार्यक्रमात योग प्रशिक्षक गोपाळराव देशपांडे यांच्या हस्ते वॉटर फिल्टरचे पूजन करण्यात आले, तर एम. पी. मोरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष वाय. पी. नाईक यांच्या हस्ते वॉटर फिल्टरचे उद्घाटन करण्यात आले.

प्रास्ताविकात मुख्याध्यापक पी. आर. सांबरेकर यांनी महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे ग्रामीण भागात विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवले जात असल्याचे सांगितले. विशेषतः विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे आणि विधायक विचारांना चालना देणारे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी वाय. पी. नाईक यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच महात्मा गांधी सामाजिक संस्थेच्या वतीने यल्लापा बुरुड, सौ. के. एम. सातेरी आणि मुख्याध्यापक पी. आर. सांबरेकर यांचाही शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नमंजुषा घेण्यात आली. योग्य उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘श्यामची आई’ हे पुस्तक भेट देऊन प्रोत्साहित करण्यात आले.

या कार्यक्रमाला वाय. पी. नाईक, गोपाळराव देशपांडे, यल्लापा बुरुड, पी. एस. मोरे, सौ. पी. पी. डेळेकर, पी. के. शेळके, लक्ष्मण जाधव, मुख्याध्यापक पी. आर. सांबरेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

महात्मा गांधी सामाजिक संस्थेने यापूर्वी कावळेवाडी प्राथमिक शाळा आणि बिजगर्णी हायस्कूल येथेही वॉटर फिल्टरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, मोफत पुस्तकांच्या माध्यमातून वाचन संस्कृतीला चालना देणे तसेच विविध स्पर्धांच्या आयोजनातून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला प्रोत्साहन देणे, असे समाजोपयोगी उपक्रम संस्था गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने राबवत आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. के. एम. सातेरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिक्षक के. जी. मेणसे यांनी केले.