• काँग्रेस भवनला घेरावाचा प्रयत्न ; पोलिसांनी आंदोलकांना रोखले

बेळगाव : नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराच्या निषेधासाठी झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह घोषणा देण्यात आल्याचा तसेच भाजप आमदारांवर अंडी फेकल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाने बेळगावात तीव्र आंदोलन केले. राणी चन्नम्मा चौकातून काँग्रेस भवनकडे निघालेल्या मोर्चाला पोलिसांनी अडविल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

राणी चन्नम्मा चौकातून निघालेल्या मोर्चात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. काँग्रेस भवनाला घेराव घालण्याचा प्रयत्न होताच पोलिसांनी बॅरिकेड्स उभारून आंदोलकांना रोखले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमकही झाली.

यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनके यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा वापर करून पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह घोषणा देणे आणि देशविरोधी वक्तव्ये करणे अस्वीकार्य असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा याला भाजपचा विरोध नसून, आंदोलनाच्या नावाखाली देशद्रोही कृत्ये खपवून घेतली जाणार नाहीत, असे त्यांनी म्हटले.

बंगळुरूमध्ये आंदोलनादरम्यान भाजप आमदारांवर अंडी फेकल्याच्या घटनेचाही त्यांनी निषेध केला. तसेच राज्यातील दुष्काळी परिस्थितीकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

माजी विधान परिषद सदस्य महंतेश कवटगीमठ आणि भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून आंदोलनादरम्यान देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप असलेल्या व्यक्तींची व्हिडिओ फुटेजच्या आधारे ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

मोर्चादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनाकडे जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना रोखले. त्यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत आंदोलकांना पुढे जाण्यापासून रोखले. या आंदोलनात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.