- बेळगावातील अनेक भागांचा पाणीपुरवठा बाधित
बेळगाव : राणी चन्नम्मा चौक परिसरातील प्रमुख जलवाहिनीला गळती लागल्यामुळे शहरातील विविध भागांमध्ये बुधवारी (दि. ३) पाणीपुरवठा विस्कळीत झाला. गळती दुरुस्त करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आल्याने संबंधित परिसरांमध्ये नियोजित वेळेनुसार पाणीपुरवठा करता आला नाही.
महापालिका प्रशासन आणि एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना या परिस्थितीत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. उन्हाळ्यात आधीच कमी आणि अनियमित पाणीपुरवठ्याचा सामना करणाऱ्या नागरिकांसमोर आता या नव्या अडचणीमुळे अधिक गैरसोय निर्माण झाली आहे.
शहरातील अनेक भागांत पहाटेच्या सुमारास पाणीपुरवठा केला जातो. मात्र, बुधवारी नियोजित वेळेत नळांना पाणी न आल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. गळती दुरुस्तीच्या कामामुळे बागवान गल्ली, खडे बाजार, दरबार गल्ली, भोई गल्ली, पांगुळ गल्ली, मोमीन गल्ली, बुरुड गल्ली, गणपत गल्ली, रविवार पेठ, कलईगार गल्ली, कामत गल्ली, कसाई गल्ली, अनंतशयन गल्ली, कुलकर्णी गल्ली, कोनवाळ गल्ली, शेरे गल्ली, मठ गल्ली, मुजावर गल्ली, भांदूर गल्ली, तानाजी गल्ली, तहसीलदार गल्ली, फुलबाग गल्ली, महाद्वार रोड परिसर, संभाजी गल्ली, आठवले चाळ, एसपीएम रोड, वीरभद्रनगर, गुड्स शेड रोड, फारुकिया कॉलनी, अहमदनगर आणि पोलीस क्वार्टर्स परिसरातील रहिवाशांना पाणीटंचाईचा फटका बसणार आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दुरुस्तीचे काम पूर्ण होताच पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, अशा प्रकारच्या वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडांमुळे शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवरील प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा जपून वापर करावा तसेच आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.








