बेळगाव : रामकथा ब्रम्हांड भेदून न्यावी, हे समर्थांचे म्हणणे शब्दशः सत्य ठरले आहे. आज जगातल्या बहुतेक प्रमुख भाषांमधून रामकथेचा अनुवाद झालेला आहे. श्रीराम आणि श्रीकृष्ण हे भारतीयांचे प्राण आहेत.

रामकथा अनेकांनी रचली. वाल्मिकी हे रामांना समकालीन असल्यामुळे त्यांनी लिहिलेले रामायण हे अधिकृत असल्याचे मानले जाते. भारतातल्या बहुतेक प्रमुख भाषांमध्ये रामकथेचा अनुवाद झाला आहे. इतकेच नव्हे तर पौर्वात्य देशांचे स्वतःचे रामायण आहे. श्रीराम एकीकडे नीतिमान आणि धर्माचरणी आहेतच दुसरीकडे रावणाचा वध करताना ते शस्त्राचारी सुद्धा आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. लंकेच्या सीमेवर जाऊन त्यांनी सीतेच्या सुटके करिता उपोषण केले नाही तर धनुष्यबाणाने रावणाचा वध केला, असे स्पष्ट प्रतिपादन आंतरराष्ट्रीय व्याख्याते, प्रवचनकार व साहित्यिक डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले.

केळकर बागेतील काणे महाराज राम मंदिरात त्यांची श्रीराम कथा सायंकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत चालू आहे. त्यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, हजारो वर्षांपूर्वी झालेल्या रामकथेची मोहिनी आजही जगातल्या लोकांवर पडते. हा आमचा गौरवशाली इतिहास जगात पोचला आहे. काव्यातून सांगितलेला इतिहास म्हणून त्याला काव्येतिहास म्हणतात. अयोध्येचे वर्णन करताना डॉ. शेवडे यांनी तेथील शिल्पांचे रामायणातील असलेले वर्णन सांगितले आणि आपल्याकडे शिल्पशास्त्र हे किती प्रगत होते ते आवर्जून सांगितले. एकूण या कथेतून रामायणाचे वेगवेगळे धागेदोरे डॉ. शेवडे यांच्या मुखातून ऐकायला मिळतात.