- मटका आणि जुगार प्रकरणी एकूण १० जणांना अटक
बेळगाव : शहरातील बेकायदेशीर कारवायांवर आळा घालण्यासाठी बेळगाव पोलीस आयुक्तालयाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत मटका, जुगार आणि गांजा सेवनाशी संबंधित प्रकरणांमध्ये एकूण १० जणांना ताब्यात घेण्यात आले असून दोन संशयित फरार असल्याची माहिती समोर आली आहे.
शहापूर पोलिसांनी बळ्ळारी नाल्याजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत धनराज ऊर्फ बंटू सुतार, नजीर पठाण, श्रीधर लोहार, राहुल हळगेकर, नागप्पा नाईक, विनायक दरमूड आणि विश्वनाथ गोटडकी या सात जणांना अटक केली. या कारवाईदरम्यान त्यांच्या ताब्यातून ४७ हजार २०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. तर या प्रकरणातील शशी जालगार हा संशयित घटनास्थळावरून पसार झाला.
दरम्यान, टिळकवाडी पोलिसांनी भाग्यनगर परिसरात संशयास्पद हालचाली करत असलेल्या सूरज श्याम शानभाग (वय ३५) याला ताब्यात घेतले. त्यानंतर करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत त्याने गांजाचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले.
तसेच मटका व्यवसायाशी संबंधित आणखी एका कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून एक जण फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या सर्व कारवायांमुळे बेकायदेशीर धंद्यांविरोधातील पोलिसांची मोहीम अधिक तीव्र झाल्याचे दिसून येत आहे.
या यशस्वी मोहिमेत सहभागी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पोलीस आयुक्तांनी अभिनंदन करून त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.








