• नेदरलँड्समधील दंतवैद्य असल्याचे भासवत सायबर भामट्यांकडून फसवणूक

बेळगाव : मॅट्रिमोनी ॲपवर विवाहासाठी स्थळ शोधणाऱ्या बेळगावमधील एका तरुणीची नेदरलँड्समध्ये दंतवैद्य असल्याचे भासवणाऱ्या भामट्याने तब्बल ३.३८ लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून विश्वास संपादन केल्यानंतर कस्टम शुल्क आणि जीएसटीच्या नावाखाली ही रक्कम उकळण्यात आली. याप्रकरणी बेळगाव सायबर गुन्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेळगावमधील अश्विनी (नाव बदललेले) या तरुणीची मॅट्रिमोनी ॲपवर आर्यनकुमार नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली होती. त्याने स्वतःला मूळचा हैदराबादचा असून सध्या नेदरलँड्समध्ये दंतवैद्य म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले. लग्नाचे आश्वासन देत त्याने तरुणीचा विश्वास जिंकला आणि २५ मे रोजी भारतात येत असल्याचे सांगितले.

दुसऱ्याच दिवशी दिल्ली विमानतळावर अडकल्याचे सांगत त्याने मदतीची मागणी केली. त्यानंतर विमानतळ अधिकारी असल्याचे भासवणाऱ्या एका महिलेने तरुणीशी संपर्क साधून परदेशी चलन बदलण्यासाठी ८५,८०० रुपये कस्टम शुल्क भरण्यास सांगितले. त्यानंतर सोने व हिऱ्यांच्या दागिन्यांच्या क्लिअरन्ससाठी २.५३ लाख रुपये जीएसटी भरण्याची मागणी करण्यात आली.

भामट्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तरुणीने दिलेल्या बँक खात्यावर एकूण ३.३८ लाख रुपये जमा केले. मात्र त्यानंतर संबंधितांचे फोन बंद झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

दरम्यान, सोशल मीडिया आणि मॅट्रिमोनी ॲपवरील अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवून आर्थिक व्यवहार करू नयेत, असे आवाहन सायबर पोलिसांनी नागरिकांना केले आहे.