• पोलीस आयुक्त भूषण बोरसे

बेळगाव : सोशल मीडियावर अल्पवयीन मुलामुलींचे अश्लील व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली.

मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सांगितले की, १५ डिसेंबर २०२४ रोजी इन्स्टाग्राम मेसेंजरद्वारे अल्पवयीन मुलामुलींचे अश्लील व्हिडिओ प्रसारित केल्याची बाब समोर आली होती. या प्रकरणाची केंद्र सरकारच्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने गंभीर दखल घेत संबंधित व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

यानंतर शहर सायबर गुन्हे विभागाचे पोलिस कॉन्स्टेबल गंगाधर यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदविण्यात आला. तपासादरम्यान श्रीनाथ पाटील याला अटक करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे.

अल्पवयीन मुलांशी संबंधित अश्लील छायाचित्रे, व्हिडिओ किंवा अन्य आक्षेपार्ह सामग्री तयार करणे, साठवणे अथवा सोशल मीडियावर प्रसारित करणे हा गंभीर आणि कायद्याने दंडनीय गुन्हा आहे. अशा प्रकारच्या कृत्यांमध्ये सहभागी होणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिला.