- महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे आवाहन
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची बैठक युवा समिती कार्यालय कावळे संकुल टिळकवाडी बेळगाव येथे अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
बैठकीच्या सुरवातीला मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, ज्येष्ठ नेते अर्जुन गोरल तसेच इतर समिती कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अध्यक्ष अंकुश केसरकर म्हणाले कर्नाटक शासनाने डॉ. गोकाक अहवाल मान्य केल्यानंतर सर्व ठिकाणी कन्नड भाषा सक्ती करण्यास सुरवात केली. त्याला विरोध करण्यासाठी समितीच्या वतीने सत्याग्रहाच्या माध्यमातून आंदोलन करण्याचे जाहीर करण्यात आले. १ जून १९८६ रोजी मा. शरद पवार गनिमी काव्याने कित्तूर राणी चन्नमा चौकात दाखल झाले आणि त्यांनी सत्याग्रह केला. महाराष्ट्राच्या नेत्यांना बेळगाव बंदी असून देखील सत्याग्रह यशस्वी झाल्याने प्रशासनाने शरद पवाराना अटक केली, ही बातमी सर्वदूर सीमाभागात पसरली लोक रस्त्यावर उतरून निदर्शने करू लागली बेळगावात हरताळ पाळला गेला, परिस्थिती स्पोटक बनली, आंदोलकांवर गोळीबार झाला या गोळीबारात नऊ निष्पाप मराठी भाषिकांना हौतात्म्य आले. शिवाय कित्येक कार्यकर्त्यांना अटक करून वेगवेगळ्या तुरुंगात डांबण्यात आले. हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण ठेवून सीमाप्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध रहाणे गरजेचे आहे.
यावर्षी सोमवार दिनांक १ जून रोजी सकाळी ८.३० वाजता हुतात्मा स्मारक हिंडलगा हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे तरी सर्व मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले.
- शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा निर्णय :
दरवर्षी प्रमाणे युवा समितीच्या वतीने मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येते. यावर्षी उपक्रमाचे हे नववे वर्ष असून यावर्षी ३०० शाळांना ही साहित्य वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
- दहावीच्या गुणवंतांचा होणार सत्कार :
युवा समितीच्या वतीने येणाऱ्या जुलै महिन्यात मराठी माध्यमातील १० वी मध्ये बेळगाव शहर, बेळगाव तालुका आणि खानापूर विभागातील पहिला दुसरा आणि तिसरा क्रमांक आलेल्या विद्यार्थांचा सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सुरज कुडूचकर, किरण हुद्दार, संतोष कृष्णाचे, अक्षय बांबरकर, सुरज चव्हाण, महांतेश अलगोंडी, अश्वजीत चौधरी, रोहन कुंडेकर, आनंद पाटील, आकाश भेकणे, आशिष कोचेरी, प्रकाश हेब्बाजी आदी उपस्थित होते. चिटणीस प्रतीक पाटील यांनी आभार मानले.








