• ट्रकच्या धडकेत तिघांचा मृत्यू; दहाहून अधिक जण जखमी
  • जखमींपैकी चौघांची प्रकृती गंभीर

बेळगाव : हुक्केरी तालुक्यात दुर्गादेवीच्या मूर्तीची मिरवणूक सुरू असताना भरधाव ट्रकने भाविकांना धडक दिल्याने भीषण दुर्घटना घडली. मणगुत्ती आणि हत्तरगी टोलनाक्याजवळ घडलेल्या या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दहाहून अधिक जण जखमी झाले. जखमींपैकी चौघांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हुंचेनट्टी येथील दुर्गादेवीची मूर्ती मिरवणुकीतून नेली जात होती. त्याचवेळी मागून आलेल्या ट्रकने मिरवणुकीतील भाविकांना जोरदार धडक दिली. या धडकेमुळे घटनास्थळी गोंधळ उडाला आणि अनेक जण जखमी झाले.

या दुर्घटनेत प्रकाश, महेश आणि दानेश्वरी यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी बेळगाव जिल्हा रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यमकनमर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, अपघाताबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. मृत आणि जखमींची अधिकृत माहिती तसेच दुर्घटनेची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.