• दहा दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
  • विजयादशमीला सुवर्ण अंबारीतील जंबो सवारीचे मुख्य आकर्षण

म्हैसूर : जगप्रसिद्ध म्हैसूर दसरोत्सवाला आज, रविवारपासून भव्य प्रारंभ होत आहे. दहा दिवस चालणाऱ्या या ऐतिहासिक महोत्सवासाठी म्हैसूर नगरी सज्ज झाली असून, देश-विदेशातील पर्यटक शहरात दाखल होऊ लागले आहेत. आकर्षक विद्युत रोषणाई, सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक विधी आणि विजयादशमीच्या दिवशी निघणारी भव्य जंबो सवारी हे यंदाच्या उत्सवाचे प्रमुख आकर्षण असणार आहे.

यंदाच्या दसरोत्सवाचे उद्घाटन कोप्पळ येथील गविमठाचे मठाधीश श्री अभिनव गविसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते होणार आहे. म्हैसूर दसऱ्याचे उद्घाटन करणारे ते सातवे मठाधीश ठरणार आहेत. काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात मठाधीशांच्या हस्ते उत्सवाचे उद्घाटन होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जात आहे. रविवारी सकाळी ११.५० ते दुपारी १२.४३ या शुभ मुहूर्तावर चामुंडी टेकडीवर उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत चामुंडी टेकडीवर सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश दिला जाणार नाही.

उद्घाटनानंतर दसरा प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून, सायंकाळी ६ वाजता म्हैसूर राजवाड्यात नवरात्र पूजेचा कार्यक्रम होईल. त्यानंतर सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत राजवाड्यासमोरील विद्युत रोषणाईचे अनावरण करण्यात येणार आहे. शहरातील सुमारे १४६ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर आणि ११८ चौकांमध्ये करण्यात आलेली आकर्षक रोषणाई पर्यटकांचे लक्ष वेधून घेणार आहे.

दसरोत्सवाच्या कालावधीत विविध सांस्कृतिक, धार्मिक आणि साहसी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. युवा दसरा, सरस्वती पूजा, कुस्ती स्पर्धा आणि चिखलातील रेडा पकडण्याच्या स्पर्धेसह सूर्य किरण विमानांच्या हवाई प्रात्यक्षिकांचाही कार्यक्रम नियोजित आहे. २० ऑक्टोबर रोजी महानवमी आणि आयुध पूजा साजरी केली जाणार आहे. या कार्यक्रमांमुळे उत्सवाच्या दहा दिवसांत म्हैसूरमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

२१ ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या दिवशी दसरोत्सवाचा मुख्य सोहळा पार पडणार आहे. म्हैसूर राजवाड्यापासून बन्नीमंडपपर्यंत देवी चामुंडेश्वरीची मूर्ती सुवर्ण अंबारीत विराजमान करून भव्य जंबो सवारी मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी बन्नीमंडप येथे होणाऱ्या टॉर्चलाइट परेडने उत्सवाची सांगता होईल.

दरम्यान, म्हैसूरच्या राजघराण्याकडून साजऱ्या होणाऱ्या पारंपरिक शाही दसऱ्यालाही आजपासून सुरुवात होत आहे. अंबाविलास राजवाड्यात होणाऱ्या या सोहळ्यात राजमाता प्रमोदा देवी वडेयर सहभागी होणार आहेत. सार्वजनिक दसरोत्सवाबरोबरच शाही दसऱ्याच्या परंपराही यानिमित्ताने जपल्या जाणार आहेत.