- थावरचंद गेहलोत यांची जागा घेणार
- राष्ट्रपतींकडून सहा राज्यांतील राज्यपालांच्या नियुक्त्या जाहीर
बेंगळुरू : डॉ. सुधा यादव यांची कर्नाटकच्या नव्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी सहा राज्यांतील राज्यपालांच्या नियुक्त्या आणि बदल जाहीर केले. या निर्णयानुसार, सुधा यादव या विद्यमान राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्यानंतर पदभार स्वीकारणार आहेत.
हरियाणातील महेंद्रगड येथील डॉ. सुधा यादव या भारतीय जनता पक्षाच्या माजी खासदार असून त्यांनी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या सदस्या म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे कर्नाटकच्या राज्यपालपदाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या त्या दुसऱ्या महिला ठरणार आहेत. यापूर्वी व्ही. एस. रमादेवी यांनी १९९९ ते २००२ या कालावधीत कर्नाटकच्या राज्यपाल म्हणून काम केले होते.
राष्ट्रपती भवनाकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, सुधा यादव यांची नियुक्ती त्या राज्यपालपदाचा कार्यभार स्वीकारतील तेव्हापासून लागू होईल. त्यांच्या नियुक्तीकडे कर्नाटकातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
या फेरबदलांत कर्नाटकसह तामिळनाडू, केरळ, ओडिशा, उत्तराखंड आणि सिक्कीम या राज्यांचाही समावेश आहे. या राज्यांमध्ये नव्या राज्यपालांची नियुक्ती करून केंद्राने राज्यपालांच्या जबाबदाऱ्यांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत.








