• राष्ट्रीय महामार्गांवरील वाहतूक विस्कळीत
  • सरकारच्या आश्वासनावर शेतकरी नाराज
  • महाराष्ट्रासह कर्नाटकात अनेक ठिकाणी रास्ता रोको

बेळगाव : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांसोबत झालेली उच्चस्तरीय बैठक निष्फळ ठरल्याने शेतकरी संघटनांमध्ये नाराजी पसरली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी महिनाभरात समिती स्थापन करण्याचे आश्वासन सरकारने दिले असले, तरी या आश्वासनावर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी असमाधान व्यक्त केले आहे.

बैठकीत ठोस निर्णय न झाल्याने शेतकरी संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. मंगळवार, १३ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील प्रमुख राष्ट्रीय महामार्गांवर चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. कराड, सातारा, इंदापूर तसेच कोगनोळी टोलनाक्यासह विविध ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.

या आंदोलनामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. महामार्गांवरील वाहतूक रोखण्यात आल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत असून, शेतकऱ्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.