• प्रलंबित नुकसान भरपाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
  • सिंचन महामंडळावर दिरंगाई आणि लाचेच्या मागणीचे गंभीर आरोप
  • विशेष बैठकीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

बेळगाव : हिडकल जलाशयासाठी जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांच्या प्रलंबित नुकसानभरपाईच्या प्रश्नावरून आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. शेकडो जलाशयग्रस्त शेतकरी आपल्या जनावरांसह राणी चन्नम्मा सर्कल येथे रस्त्यावर उतरले. सिंचन महामंडळाच्या अधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करत आंदोलकांनी काही काळ रस्ता रोको केला आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.

हुक्केरी तालुक्यातील हिडकल जलाशयग्रस्तांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. नुकसानभरपाईची प्रक्रिया जाणीवपूर्वक रखडवली जात असून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी सिंचन महामंडळाच्या अधिकाऱ्यांवर केला.

आंदोलनाचे नेतृत्व करणारे ज्येष्ठ शेतकरी नेते बालेश मावनूर यांनी सांगितले की, जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी या प्रकरणी अनेक बैठका घेऊन अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. मात्र, काही अधिकारी मंत्र्यांनाही चुकीची माहिती देत असल्याने शेकडो एकर जमिनीची नुकसानभरपाई अद्याप रखडली आहे.

सरकार किंवा महसूल विभागाविरोधात आमचा संघर्ष नसून सिंचन महामंडळातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कारभाराविरोधात लढा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एसएलओ कार्यालयात आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असतानाही चुकीचे अहवाल तयार करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील आणि गरज पडल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला.

दरम्यान, आंदोलकांचे निवेदन स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सिंचन महामंडळाच्या उत्तर विभागाच्या मुख्य अभियंत्यांसोबत विशेष बैठक घेण्याची घोषणा केली. या बैठकीसाठी आंदोलनकर्त्यांच्या चार ते पाच प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

बैठकीत अधिकाऱ्यांनी सादर केलेली कागदपत्रे आणि शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येईल. आवश्यक वाटल्यास राज्य सरकारकडे स्वतंत्र अहवालही पाठविला जाईल. वस्तुस्थितीची सखोल छाननी करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आंदोलकांना दिले.