- ऊसाच्या शेतात काम करताना घडली दुर्घटना
- हेस्कॉमच्या निष्काळजीपणाचा नातेवाईकांचा आरोप
बेळगाव : जिल्ह्यातील मुधोळगी तालुक्यातील नागनूर गावाजवळ ऊसाच्या शेतात काम करत असताना तुटलेल्या वीजवाहिनीच्या तारेचा स्पर्श झाल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या दुर्घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून, हेस्कॉमच्या निष्काळजीपणामुळे दोन निष्पाप जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
मृतांची ओळख मुत्तप्पा श्रीशैल मुगळखोड (४६) आणि राजेश्वरी मुगळखोड (३६) अशी झाली आहे. दोघेही आपल्या ऊसाच्या शेतात तण काढण्याचे काम करत असताना अचानक वीजवाहिनीची तार तुटून खाली पडली. तुटलेल्या तारेचा स्पर्श होताच दोघांनाही विजेचा तीव्र धक्का बसला आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच मुधोळगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून, दुर्घटनेच्या कारणांचा तपास सुरू आहे.
दरम्यान, या दुर्घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी हेस्कॉम प्रशासनावर गंभीर निष्काळजीपणाचा आरोप केला. धोकादायक स्थितीत असलेल्या वीजवाहिन्यांची वेळेत दुरुस्ती व देखभाल न केल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप करत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची आणि मृतांच्या कुटुंबीयांना योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे नागनूर परिसरात शोककळा पसरली असून, शेतकरी आणि ग्रामस्थांनी शेतांमधील वीजवाहिन्यांची तातडीने तपासणी करून अशा दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.







