- चार आरोपी अटकेत ; हारुगेरी पोलिसांची कारवाई
- सुमारे २५.८९ लाखांचा मुद्देमाल जप्त
बेळगाव : जिल्ह्यातील विविध मंदिरांमध्ये चोरीच्या घटना घडविणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा हारुगेरी पोलिसांनी पर्दाफाश करत चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने, कांस्य वस्तू आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण २५ लाख ८९ हजार २९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रायबाग तालुक्यातील हंदिगुंड गावातील रणम्मा देवी मंदिरात ६ नोव्हेंबर २०२५ रोजी सोन्याचे मंगळसूत्र व चांदीचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी महादेव बिराज यांनी हारुगेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपासाला वेग दिला.
पोलीस अधीक्षक के. रामराजन आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक आर. बी. बसरगी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली. तपासादरम्यान अथणी तालुक्यातील अदळहट्टी येथील विजय भीमप्पा गुडदिन्नी, कल्लेश अल्लाप्पा मुराबत्ती, शिवानंद विठ्ठल चिक्कट्टी आणि संगमेश शंकर ऐनापूर यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
आरोपींकडून १ तोळा ५ मिली सोन्याचे दागिने, ७ किलो ७६० ग्रॅम चांदीचे दागिने, २९ किलो ५०० ग्रॅम कांस्य धातूच्या वस्तू तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली महिंद्रा पिकअप गाडी जप्त करण्यात आली.
सखोल चौकशीत आरोपींनी हारुगेरीसह अथणी, कागवाड, ऐगळी आणि लोकापूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अनेक मंदिरांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी विशेष तपास पथकाचे अभिनंदन केले.








