- मे महिन्यातील पेरणीचा मुहूर्त साधण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ
खानापूर : तालुक्यातील हलशी परिसरात मे महिन्यातील पेरणीचा हंगाम गाठण्यासाठी शेतकरी सध्या शिवारात व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे. हलगा, मेरडा, हत्तरवाड, किरहलशी, मेंढेगाळी आणि करजगी परिसरात भात पिकाच्या पेरणीपूर्व तयारीला वेग आला आहे.
अलीकडे झालेल्या वळीव पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी वाफे तयार करून पेरणीच्या कामांना सुरुवात केली आहे. यंदा चांगला पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केल्यामुळे शेतकरीही उत्साहात शेतीकामात गुंतले आहेत. जमिनीच्या प्रकारानुसार विविध पिकांची निवड करून पेरणीची तयारी केली जात आहे.
शिवारातील मशागत, बांधबंदिस्ती, शेणखत टाकणे यांसारखी प्राथमिक कामे अनेक ठिकाणी पूर्ण झाली आहेत. योग्य वेळेत पेरणी पूर्ण व्हावी यासाठी शेतकरी बैलजोडी तसेच ट्रॅक्टरच्या सहाय्याने कामे करताना दिसत आहेत. काही ठिकाणी रोटावेटरच्या मदतीने जमीन भुसभुशीत करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, शेतीमजुरीचे दरही वाढले आहेत. भात पेरणीसाठी बैलजोडीला दिवसाला सुमारे दोन हजार रुपये मजुरी द्यावी लागत आहे. तर ट्रॅक्टर आणि रोटावेटरद्वारे मशागत व पेरणीसाठी प्रतितास सुमारे एक हजार रुपये खर्च येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
चांगल्या पावसाच्या अपेक्षेने शेतकरी वर्ग आशावादी असून, मे महिन्यातील पारंपरिक पेरणीचा मुहूर्त साधण्यासाठी हलशी परिसरातील शिवारात सध्या मोठी लगबग सुरू आहे.







