• १४ हजार लिटर स्पिरीटसह ट्रक जप्त ; ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
  • अबकारी विभागाची कारवाई

खानापूर : तालुक्यातील जांबोटी – कणकुंबी मार्गावर अबकारी विभागाने मोठी कारवाई करत बेकायदा स्पिरीट वाहतूक करणारा ट्रक जप्त केला. या कारवाईत १४ हजार लिटर स्पिरीटसह सुमारे ३५ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. मंगळवार दि. १९ मे रोजी ही कारवाई करण्यात आली.

अशोक लेलँड कंपनीच्या बँकर प्रकारातील सहा चाकी वाहनातून (क्र. KA-22 B-3793) अवैधरित्या स्पिरीटची वाहतूक विक्रीच्या उद्देशाने केली जात असल्याची माहिती अबकारी विभागाला मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी सापळा रचून संबंधित वाहन अडवले असता त्यामध्ये १४ हजार लिटर स्पिरीट आढळून आले.

या प्रकरणी वाहन चालक सिद्धराजू पुट्टस्वामी शेट्टी (वय ४७, रा. हेग्गिनवाळू, ता. नंजनगुड, जि. म्हैसूर) याच्याविरुद्ध बीएनएसएस कायदा २०२३ च्या कलम ३५(३) अन्वये पुढील तपासासाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच वाहन मालकाचा शोध घेऊन त्याला अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे अबकारी विभागाने सांगितले.

जप्त करण्यात आलेल्या स्पिरीटची किंमत अंदाजे १४ लाख रुपये असून वाहनाची किंमत सुमारे २१ लाख रुपये आहे. अशाप्रकारे एकूण ३५ लाख १ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ही कारवाई डॉ. वाय. मंजुनाथ, अबकारी आयुक्त (केंद्रीय कार्यालय, बेळगाव), एफ. एच. चलवादी, अबकारी संयुक्त आयुक्त (प्रशासन), बेळगाव विभाग, तसेच जगदीश एन. के., अबकारी उपआयुक्त, बेळगाव (दक्षिण) जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. विजयकुमार जे. हिरेमठ, अबकारी अधीक्षक यांच्या सूचनेनुसार रवी एम. मुरगोड, उपअधीक्षक (बेळगाव उपविभाग) यांच्या नेतृत्वाखाली धाड टाकण्यात आली.

या कारवाईत मंजुनाथ मेळ्ळिगेरी (अबकारी निरीक्षक), नुरुल्ला खान (उपनिरीक्षक, खानापूर विभाग), सुनील एस. पाटील (उपनिरीक्षक, डीसीई कार्यालय), तसेच अबकारी कर्मचारी वाय. बी. पाटील, विवेकी आणि वाहनचालक प्रकाश यांनी सहभाग घेतला. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.