- १० ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबरदरम्यान उत्सव स्पेशलच्या सात फेऱ्या
- बेळगावसह मार्गावरील प्रवाशांना मोठा फायदा
बेळगाव : दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेतर्फे मुंबई-बेंगळुरू मार्गावर उत्सव स्पेशल रेल्वे सुरू करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल, बेंगळुरू अशी ही विशेष रेल्वे धावणार असून, बेळगावमधूनही तिची सेवा उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात मुंबई आणि बेंगळुरूकडे प्रवास करणाऱ्या बेळगावातील प्रवाशांना सोयीचे होणार आहे.
मुंबई-बेंगळुरू उत्सव स्पेशल १० ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबरदरम्यान धावणार आहे. मुंबईहून रात्री १२.३५ वाजता सुटणारी रेल्वे दुसऱ्या दिवशी रात्री ११.५५ वाजता बेंगळुरूला पोहोचेल. परतीच्या प्रवासात बेंगळुरूहून पहाटे ४.३० वाजता सुटणारी रेल्वे दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वाजता मुंबईला पोहोचणार आहे.
या विशेष रेल्वेच्या एकूण सात फेऱ्या होणार आहेत. मुंबईहून प्रत्येक शनिवारी, तर बेंगळुरूहून रविवारी ही रेल्वे धावणार आहे. या रेल्वेला दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, लोणंद, सातारा, कराड, सांगली-मिरज, कुडची, रायबाग, घटप्रभा, बेळगाव, लोंढा, धारवाड, हुबळी, हावेरी, राणेबेन्नूर, हरिहर, दावणगेरी, बिरूर, अरसीकेरे आणि तुमकूर येथे थांबे देण्यात आले आहेत.
एकूण १८ डब्यांची ही विशेष रेल्वे असून, सणासुदीच्या काळातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.








