- चार दिवसांच्या शोधमोहीमेला यश ; खानापूर पोलिसांकडून पंचनामा
खानापूर : होनकल (ता. खानापूर) येथून चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या १८ वर्षीय मनोज मंगेश देसाई याचा मृतदेह अखेर मंगळवारी (दि. २२ सप्टेंबर) कुपटगिरी गावाजवळ मलप्रभा नदीपात्रात आढळून आला. दुपारी सुमारे २.१५ वाजता शोधमोहीमेदरम्यान मृतदेह सापडला. या घटनेमुळे देसाई कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
मनोज हा शुक्रवारी (दि. १८ सप्टेंबर) सकाळपासून घरातून बेपत्ता झाला होता. त्याच रात्री सुमारे ८ वाजता त्याचा मोबाईल बंद असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. नातेवाईकांनी शोध घेतला असता, बेळगाव-गोवा महामार्गावरील कुपटगिरी गावाजवळ मलप्रभा नदीवरील पुलाखाली त्याची दुचाकी आढळून आली. त्यामुळे मनोजचा नदीपात्रात शोध सुरू करण्यात आला.
गेल्या दोन दिवसांपासून अग्निशामक दलाच्या जवानांसह सोशल वर्कर रेस्क्यू टीमचे अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हूळी, शुभम हूळी आणि राजू टक्केकर यांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम राबवली. नदीपात्रात सातत्याने शोध घेऊनही मनोजचा ठावठिकाणा लागत नव्हता.
अखेर मंगळवारी शोधमोहीमेदरम्यान मनोजचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
या प्रकरणाची नोंद खानापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, मनोजच्या मृत्यूमागील नेमके कारण व परिस्थितीचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.







