- संगीत क्षेत्रावर शोककळा
मुंबई : भारतीय संगीतविश्वातील मधुर आणि सुरेल आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे वयाच्या ८९व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने हिंदी आणि मराठी संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत असून संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.
१९५४ मध्ये पार्श्वगायिका म्हणून कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या सुमन कल्याणपूर यांनी ६० आणि ७० च्या दशकात आपल्या अवीट गोड आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. मोहम्मद रफी, मुकेश, किशोर कुमार आणि मन्ना डे यांच्यासोबत त्यांनी अनेक अजरामर गीते गायली. ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे’ आणि ‘ना तुम हमें जानो’ यांसारखी त्यांची गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत.
हिंदी चित्रपटसृष्टीसोबतच मराठी भावसंगीतातही त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ‘शब्द शब्द जपून ठेव’, ‘केतकीच्या वनी येथे’, ‘पाखरा जा रे दूर देशी’, ‘मृदुल करांनी छेडित तारा’ यांसारख्या भावगीतांनी मराठी रसिकांच्या हृदयात कायमचे स्थान मिळवले.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या आवाजाशी साधर्म्य असूनही सुमन कल्याणपूर यांनी आपल्या स्वतंत्र शैलीत आणि वैशिष्ट्यपूर्ण गायकीतून भारतीय संगीतविश्वात वेगळे स्थान निर्माण केले. मराठी, हिंदीसह विविध भारतीय भाषांमध्ये त्यांनी शेकडो गाणी गायली.
भारतीय संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल केंद्र सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. तसेच महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार आणि गदिमा पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला होता. सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रातील एक सुश्राव्य, अजरामर आणि भावस्पर्शी अध्याय कायमचा हरपला आहे.







