हत्तरगी : गोकुळ अष्टमीनिमित्त श्री हरी मंदिर, हत्तरगी (ता. हुक्केरी) येथे आयोजित करण्यात आलेल्या संगीत भजन स्पर्धेत वाल्मिकी भजनी मंडळ, कुद्रेमानी यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेत वाल्मिकी भजनी मंडळाने आपल्या सुमधुर गायनातून आणि सुरेल भजन सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली. मंडळाला मिळालेले पारितोषिक सुप्रसिद्ध गायिका सौ. मंजुश्री कुलकर्णी यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी मंडळाच्या सदस्यांनी पारितोषिक स्वीकारले.

या यशामागे मंडळाचे गुरुजी ह.भ.प. नंदू केसरकर महाराज यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मंडळातील सदस्यांनी सातत्याने भजनाची साधना करत संगीत व भक्तीचा सुंदर संगम साधला आहे.

या भजनी मंडळामध्ये जोतिबा बडसकर, महादेव हेमाणा तरवाळ, सुभाणा वैजू तरवाळ आणि नामदेव मल्लाप्पा कांबळे यांचा सहभाग आहे. तसेच श्रीमंता रा. नाईक, सौ. शांता ता. तरवाळ आणि सौ. ललिता प. तरवाळ यांनी सहभाग घेतला.

मंडळाच्या उपक्रमाला राजेंद्र पाटील, मारुती भ. तरवाळ, परशराम तरवाळ, यल्लाप्पा तरवाळ, मैलापा तरवाळ आणि तानाजी तरवाळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

वाल्मिकी भजनी मंडळाने अनेक बक्षिसे मिळविली आहेत. या यशाबद्दल कुद्रेमानी परिसरातून त्यांचे अभिनंदन होत असून, भक्ती, संगीत आणि सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपणाऱ्या मंडळाच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.