• चेअरमन डी. जी. पाटील यांचे प्रतिपादन
  • वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

येळ्ळूर : शिवाजी रोड, येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा नेताजी कार्यालयाच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन डी. जी. पाटील होते.

सभेच्या प्रारंभी संस्थेच्या दिवंगत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर डी. जी. पाटील यांच्या हस्ते नेताजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपाध्यक्ष रघुनाथ मुरकुटे, युवा संघटनेचे अध्यक्ष किरण गिंडे, सेक्रेटरी के. एन. पाटील, संचालक संजय मजुकर, प्रा. सी. एम. गोरल, रवींद्र गिंडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक प्रा. सी. एम. गोरल यांनी केले.

यावेळी बोलताना चेअरमन डी. जी. पाटील यांनी सांगितले की, सभासदांनी संस्थेवर दाखविलेल्या विश्वासामुळे गेल्या २५ वर्षांत नेताजी मल्टीपर्पज सोसायटीने उल्लेखनीय प्रगती केली आहे. येळ्ळूर आणि वडगाव येथे संस्थेच्या स्वतःच्या इमारती असून, आर्थिक व्यवहारांसोबतच येळ्ळूर येथे मराठी सांस्कृतिक भवनाची उभारणी करण्यात आली आहे. संस्थेने प्रगतीचे अनेक टप्पे यशस्वीपणे पार केले असल्याचे त्यांनी नमूद केले.

  • ६८ कोटींची वार्षिक उलाढाल

उपाध्यक्ष रघुनाथ मुरकुटे यांनी संस्थेच्या आर्थिक स्थितीची माहिती देताना सांगितले की, सोसायटीची वार्षिक उलाढाल ६८ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. संस्थेची गुंतवणूक ४ कोटी रुपये, ठेवी ३२ कोटी रुपये, कर्जे २० कोटी ६० लाख रुपये आणि भागभांडवल ४७ लाख रुपये आहे. आर्थिक वर्षात संस्थेला ४ लाख ५० हजार रुपयांचा नफा झाल्याचेही त्यांनी सांगितले.

ताळेबंद पत्रकाचे वाचन सेक्रेटरी दीपक हट्टीकर यांनी, तर नफा-तोटा पत्रकाचे वाचन चांगदेव मुरकुटे यांनी केले. यावेळी रघुनाथ मुरकुटे आणि के. एन. पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

सभेला संचालक संजय मजुकर, रवींद्र गिंडे, प्रा. सी. एम. गोरल, कल्लप्पा बंडाचे, मीनाजी नाईक, भोमाणी छत्र्यान्नावर, चांगुणा मुरकुटे, परशराम गिंडे, गणपती हट्टीकर, शंकर मुरकुटे, अनिल पाटील, प्रभाकर कणबरकर, पांडुरंग घाडी, अनिल मुरकुटे, जोतिबा गोरल, वसंत मुचंडी, कांचन पाटील, कल्याणी पाटील, रवींद्र कणबरकर, ज्योती यरमाळकर, सोनाली सायनेकर, संगीता दणकारे यांच्यासह सभासद आणि भागधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेवटी संचालक संजय मजुकर यांनी आभार मानले.