- मुलाचा जागीच मृत्यू ; गंभीर जखमी वडिलांचाही उपचारादरम्यान मृत्यू
- अज्ञात टेम्पोचालक पसार
खानापूर : लोकोळी क्रॉस–तोपिनकट्टी मार्गावर सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात बाप-लेकाचा मृत्यू झाल्याने लक्केबैल व लोकोळी परिसरावर शोककळा पसरली आहे. दुचाकीला समोरून आलेल्या अज्ञात टेम्पोने जोरदार धडक दिल्याने २३ वर्षीय युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या त्याच्या वडिलांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.
लक्केबैल येथील पुंडलिक अशोक नांदुरकर (वय २३) यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. त्यांचे वडील अशोक नांदुरकर (वय ६०) गंभीर जखमी झाले होते. नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, पुंडलिक आणि अशोक नांदुरकर हे सोमवारी सकाळी दुचाकीवरून बेळगावच्या दिशेने निघाले होते. सकाळी सुमारे सातच्या सुमारास लोकोळी क्रॉस–तोपिनकट्टी मार्गावरील एका वळणावर त्यांच्या दुचाकीला समोरून आलेल्या अज्ञात टेम्पोने जोरदार धडक दिली. धडकेत पुंडलिक यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघातानंतर टेम्पोचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. त्यामुळे अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाचा व चालकाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
पुंडलिक हे उद्यमबाग परिसरात नियमितपणे कामासाठी जात होते, तर अशोक नांदुरकर हे गवंडी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. एकाच अपघातात कुटुंबातील बाप-लेकाचा मृत्यू झाल्याने नांदुरकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लालसाब गोवंडी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून, अपघात नेमका कोणत्या वाहनामुळे झाला याचा शोध घेतला जात आहे. या घटनेने लक्केबैल तसेच लोकोळी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.








