• मुतगा येथे मॉर्निंग वॉकदरम्यान दुर्दैवी घटना ; अज्ञात दुचाकीस्वाराचा शोध सुरू

बेळगाव : मुतगा गावातील रहिवासी आणि भाजप बेळगाव ग्रामीण अल्पसंख्याक युवा मोर्चाचे उपाध्यक्ष महावीर बाबू गुडाज (वय ५०) यांचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी घडली. नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महावीर यांना भरधाव दुचाकीने धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे.

महावीर गुडाज हे सकाळी साडेपाचच्या सुमारास मुतगा येथून सांबरा रोडच्या दिशेने पायी जात होते. यावेळी भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर महावीर यांना दुचाकीस्वाराने सुमारे १०० फूट फरफटत नेल्याचे सांगण्यात येत आहे. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

महावीर गुडाज हे भाजप बेळगाव ग्रामीण अल्पसंख्याक युवा मोर्चाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

या घटनेमुळे मुतगा गावावर शोककळा पसरली असून, ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त होत आहे. अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झालेल्या अज्ञात दुचाकीस्वाराचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. घटनेची नोंद करून संबंधित पोलिसांनी तपास सुरू केला असून, अपघातास कारणीभूत ठरलेल्या दुचाकीस्वाराचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.