- आंतर-बटालियन दहीहंडी स्पर्धेत जवानांचा उत्स्फूर्त सहभाग
बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये (द मराठा एलआयआरसी) भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साह आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. लष्करी परंपरेचा दिमाख आणि भारतीय संस्कृतीचा संगम साधत ४ सप्टेंबर रोजी मिलिटरी महादेव मंदिरात विशेष पूजा, प्रार्थना आणि धार्मिक विधी पार पडले.
या कार्यक्रमाला द मराठा एलआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय, SM, VSM, फॅमिली वेल्फेअर ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षा श्रीमती वेदा उपाध्याय यांच्यासह अधिकारी, जेसीओ, जवान आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून मंदिरात भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा सोहळा भक्तिभावाने साजरा करण्यात आला. विशेष पूजा आणि प्रार्थनेत जवान तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

- जवानांचा दहीहंडी स्पर्धेत उत्साह :
जन्माष्टमीच्या निमित्ताने ५ सप्टेंबर रोजी सकाळी आंतर-बटालियन दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. रेजिमेंटमधील विविध बटालियनच्या संघांनी स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेतला.
दहीहंडी फोडण्यासाठी जवानांनी दाखवलेली जिद्द, सांघिक भावना आणि स्पर्धात्मक वृत्ती यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. एकमेकांना सहकार्य करत जवानांनी सांघिक एकजुटीचे दर्शन घडवले.
जन्माष्टमी उत्सवाच्या माध्यमातून श्रद्धा, भारतीय संस्कृती आणि लष्करी रेजिमेंटल भावना यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळाला. या उत्सवामुळे जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांमधील स्नेहबंध अधिक दृढ झाले. तसेच भारतीय संस्कृती आणि परंपरेचा अभिमानाने गौरव करण्यात आला.








