- हजारो भाविकांची उपस्थिती
- ढोल-ताशांचा गजर आणि आकर्षक रोषणाईने शहर दुमदुमले
बेळगाव : ढोल – ताशांचा गजर, आकर्षक रोषणाई आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने शुक्रवारी बेळगाव शहराचा परिसर भक्तिमय झाला. चव्हाट गल्लीतील ‘बेळगावचा राजा’ गणेशमूर्तीचा यंदा प्रथमच आयोजित करण्यात आलेला भव्य आगमन सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
धर्मवीर संभाजी सर्कलपासून सुरू झालेली गणेशमूर्तीची मिरवणूक चव्हाट गल्लीच्या दिशेने मार्गस्थ झाली. मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी मोठी गर्दी केली होती. भव्य गणेशमूर्ती, आकर्षक सजावट आणि झगमगणारी विद्युत रोषणाईने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
- ढोल-ताशांच्या गजरात तरुणाईचा उत्साह
मिरवणुकीत तरुणाईचा उत्साह विशेष पाहायला मिळाला. ढोलासह विविध वाद्यांच्या तालावर तरुणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. लहान मुलांनीही ढोल वाजवत मिरवणुकीत रंग भरला. कुटुंबासह मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांनी गणेशमूर्तीचे दर्शन घेत हात जोडून बाप्पाला वंदन केले.
रात्रीच्या वेळी मिरवणूक मार्गावर करण्यात आलेल्या आकर्षक रोषणाईमुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. बाप्पाच्या दर्शनासाठी जमलेला जनसागर, मोबाईलमध्ये मिरवणुकीची छायाचित्रे आणि व्हिडिओ टिपणारे तरुण तसेच सतत सुरू असलेला ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष यामुळे उत्सवाचे वातावरण अधिकच भारावून गेले.
- पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मिरवणुकीसाठी झालेली मोठी गर्दी लक्षात घेऊन शहर पोलिसांकडून सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले होते. प्रमुख चौक तसेच गर्दीच्या ठिकाणी पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मिरवणूक सुरळीत पार पडावी यासाठी वाहतुकीवरही विशेष लक्ष ठेवण्यात आले.
चव्हाट गल्लीतील ‘बेळगावचा राजा’च्या भव्य आगमनाने यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवात आणखी एका आकर्षणाची भर पडली आहे. भक्ती, सांस्कृतिक उत्साह आणि तरुणाईचा जल्लोष यांचा सुंदर संगम घडवून आणणारी ही मिरवणूक बेळगावकरांसाठी विशेष आकर्षण ठरली.







