- ग्रामीण विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
- विजेत्यांचा रोख रक्कम, गौरवपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव
कावळेवाडी : राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कावळेवाडी येथे हरिपाठ अभंग व मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभलेल्या या स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप एम. पी. मोरे होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष वाय. पी. नाईक यांनी उपस्थित मान्यवरांचे सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. नामदेव मोरे यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी आदर्श सोसायटीचे चेअरमन एस. एम. जाधव, शिवनेरी सोसायटीचे अध्यक्ष पुंडलिक जाधव, ग्रामस्थ मंडळाचे चेअरमन जोतिबा मोरे, पारायण मंडळाचे अध्यक्ष हभप शिवाजी जाधव, निवृत्त मुख्याध्यापक अशोक येटले, सैनिक प्रशिक्षक बाळासाहेब पसारे, यल्लापा बुरुड, अर्जुन सुतार, केदारी कणबरकर, वाय. एन. गावडा, एस. एन. गावडे, ए. एम. यळुरकर, मारुती भ. मोरे, अण्णापा अष्टेकर, लक्ष्मण जाधव, पी. एस. मोरे आदी उपस्थित होते.
यावेळी पुंडलिक जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थीदशेतच संत साहित्याची ओळख झाल्याने संतांचे विचार जीवनासाठी प्रेरणादायी ठरतात. संतविचार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन गरजेचे आहे. या माध्यमातून संत साहित्याचा जागर होतो, तर पाठांतरामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.
- स्पर्धेतील विजेते :
- हरिपाठ अभंग पाठांतर स्पर्धा :
- प्रथम : श्रावणी शशिकांत गावडे – प्राथमिक शाळा, कावळेवाडी
- द्वितीय : श्रुती शशिकांत गावडे – प्राथमिक शाळा, कावळेवाडी
- तृतीय : वरद विनायक सुतार – बालवीर, बेळगुंदी
- मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा :
- प्रथम : दिव्या दत्तात्रय कोले – अतिवाड प्राथमिक शाळा
- द्वितीय : हर्षिता दत्तू चौगुले – मराठी शाळा, बेळवट्टी
- तृतीय : सानिका सुधीर बाचीकर – बिजगर्णी हायस्कूल
स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, गौरवपत्र, सन्मानचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला. स्पर्धेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आयोजकांनी समाधान व्यक्त केले. शिक्षक के. जी. मेणसे आणि अशोक येटले यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. सूत्रसंचालन श्री. मेणसे यांनी केले, तर के. आर. भाष्कर यांनी आभार मानले.







