• शुभम शेळके यांनी फोनवरून मांडली सीमावासीयांची व्यथा

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे उपाध्यक्ष तथा भालकी तालुकाध्यक्ष दिनेश मुधाळे यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांची भेट घेऊन सीमाभागातील मराठी जनतेची भूमिका आणि गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेल्या सीमालढ्याची वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांनीही फोनवरून देशपांडे यांच्याशी संवाद साधत सीमावासीयांच्या भावना मांडल्या.

बेळगावसह संपूर्ण सीमाभागातील मराठी जनता अनेक वर्षांपासून मातृभाषा, सांस्कृतिक अस्मिता आणि महाराष्ट्रात सामील होण्याच्या मागणीसाठी लोकशाही व घटनात्मक मार्गाने लढा देत आहे. या पार्श्वभूमीवर मराठी जनतेच्या प्रश्नांबाबत संवेदनशीलता आवश्यक असल्याची भूमिका सीमाभागातील कार्यकर्त्यांनी मांडली.

कर्नाटक रक्षण वेदिकेचे नेते नारायण गौडा यांनी यापूर्वी बेळगावात मराठी जनतेविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने सीमावासीयांमध्ये नाराजी आहे. अशा व्यक्तीची मनसे नेते संदीप देशपांडे यांनी घेतलेली भेट सीमाभागातील कार्यकर्त्यांना खटकली. त्यामुळेच दिनेश मुधाळे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन सीमाभागातील परिस्थिती देशपांडे यांच्या निदर्शनास आणून दिली.

फोनवरून शुभम शेळके यांच्याशी संवाद

या भेटीनंतर दिनेश मुधाळे यांनी शुभम शेळके आणि संदीप देशपांडे यांच्यात फोनवरून संवाद घडवून आणला. शेळके यांनी सीमाभागातील मराठी जनतेच्या भावना, कन्नड सक्तीचा इतिहास, नारायण गौडा यांची भूमिका तसेच मराठी समाजाने अनेक वर्षे केलेल्या संघर्षाची माहिती देशपांडे यांना दिली.

या चर्चेदरम्यान संदीप देशपांडे यांनी सदर भेट बेळगाव किंवा सीमाप्रश्नाशी संबंधित नव्हती, तर देशभरातील हिंदी सक्तीविरोधात व्यापक लढा उभारण्याच्या उद्देशाने झाल्याचे स्पष्ट केले.

मात्र, हिंदी सक्तीला विरोध करताना सीमाभागातील कन्नड सक्तीच्या इतिहासाकडेही त्याच संवेदनशीलतेने पाहण्याची गरज असल्याची भूमिका सीमाभागातील कार्यकर्त्यांनी मांडली आहे.

  • सीमाप्रश्न केवळ भाषेचा नाही

एका वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत देशपांडे यांनी मराठी आणि कन्नड सक्तीच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे सीमाभागातील मराठी जनतेमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. सीमावासीयांच्या मते, बेळगावचा प्रश्न हा केवळ दोन भाषांमधील सक्तीचा विषय नसून त्यामागे ऐतिहासिक आणि राजकीय पार्श्वभूमी आहे.

भाषावार प्रांतरचनेच्या काळात मराठीबहुल सीमाभाग कर्नाटकात गेला असून, हा प्रदेश महाराष्ट्रात सामील व्हावा, अशी सीमावासीयांची दीर्घकाळापासूनची मागणी आहे. त्यामुळे सीमाप्रश्न समजून घेताना या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा सखोल विचार करण्याची गरज असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

  • सीमाभागाचा इतिहास समजून घेण्याचे आवाहन

मराठी समाजासाठी सीमाप्रश्न हा केवळ भाषेचा विषय नसून मातृभूमी, सांस्कृतिक अस्मिता आणि अनेक पिढ्यांच्या संघर्षाशी जोडलेला मुद्दा असल्याचे दिनेश मुधाळे आणि शुभम शेळके यांनी स्पष्ट केले.

हिंदीची सक्ती असो किंवा कन्नडची सक्ती, कोणत्याही प्रकारची भाषिक सक्ती योग्य ठरू शकत नाही. मात्र एका भाषेच्या सक्तीला विरोध करताना दुसऱ्या भाषिक समुदायाने भोगलेल्या संघर्षाचा इतिहासही समजून घेणे आवश्यक आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

सीमाभागातील मराठी जनता कोणत्याही समाजाच्या विरोधात नसून आपल्या भाषा, संस्कृती आणि अस्मितेच्या संरक्षणासाठी सातत्याने लोकशाही मार्गाने लढत आहे. त्यामुळे सीमाभागाचा इतिहास समजून घेऊन मराठी जनतेच्या भावना संवेदनशीलतेने समजून घ्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.